सेवाधारी विभाग

सेवाधारी विभाग

श्री संस्थेकडून विविध प्रकारची 42 सेवाकार्ये सुचारु पद्धतीने राबविण्यात येतात. या सेवाकार्यामध्ये कार्यरत असणारा सेवक वर्ग हा सेवेला जीवनधर्म मानून कार्य करीत असतो. सेवावृत्तीने कार्यरत असलेले हजारो हात हे या सेवाकार्याचा प्राण आहेत.

कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता, ‌‘श्रीं‌’चे चरणी भक्तिभाव ठेवून कार्य करणारे हजारो सेवेकरी इथे कार्यरत आहेत. यात महिला सेवेकऱ्यांचाही समावेश आहे. श्री संस्थेच्या सर्वच विभागातील लहानमोठी अशी सर्व कामे हा सेवेकरी वर्ग पार पाडतो.

या सेवाधारी सेवक वर्गाचाही स्वतंत्र विभाग आहे. यासाठी श्री संस्थेने सक्षम व्यवस्था आणि यंत्रणा उभारलेली आहे. वेगवेगळ्या गावांतून आलेल्या सेवेकऱ्यांचे प्रथम गट केलेे जातात.

या सेवाधारी सेवेकऱ्यांना विविध विभागांत नेमून दिलेली सेवा ठरलेल्या स्वरुपातील असते. ‌‘श्रीं‌’चे चरणी सेवाकार्याच्या रुपाने निरपेक्ष भाव राखून सेवा रूजू करणारा सेवाधारी सेवक त्याची नेमून दिलेली सेवा संपली की लाडूप्रसाद आणि विभूती यांच्यासोबत मनाशी अपार समाधान घेऊन माघारी, आपल्या मुक्कामी परततो.

आज ‌‘श्रीं‌’च्या मंदिर परिसरात तसेच श्री संस्थेच्या विविध आस्थापनांमध्ये आढळणाऱ्या स्वच्छतेचे योगदान सेवेकऱ्यांना जाते. उत्तम वृत्तीने आणि निरपेक्ष सेवाभावाने देखील या जगात वावरता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा सेवाधारी सेवक वर्ग.

‌‘श्रीं‌’चे विषयी तसेच श्री संस्थेविषयी कमालीचे प्रेम व आदर बाळगणारा हा सेवाभावी वर्ग पाहून मन थक्क होते. येथे ‌‘श्रीं‌’च्या सेवेचे अलिखित सूत्र पुरुष सेवाधारींकरीता ‌‘श्रीं‌’चे विषयी श्रद्धा, भक्ती, आस्था आणि निष्ठा हे आहे तर महिला सेवाधारींकरिता सेवा, सत्संग, संस्कार आणि माहेरपण हे आहे.

श्री संस्थेमध्ये आज रोजी ‌‘श्रीं‌’च्या सेवेमध्ये 17,000 पुरूष आणि 22,000 महिला सेवाधारी सेवारत आहेत. हे सर्व सेवाधारी ‌‘श्रीं‌’चे सेवेकरिता आसपासच्या 10 जिल्ह्यांमधून येतात. सोबतच, अन्य 3000 सेवक सेवाधारी श्रींचे सेवेत स्थायी स्वरूपामध्ये सेवारत आहेत. त्याशिवाय आणखी 30,000 सेवाधारी प्रतिक्षा यादीमध्ये असून सेवेच्या प्रतिक्षेत आहेत.

‌‘श्रीं‌’च्या सेवेत येण्यासाठी सेवाधारी गटासंबंधीचे नियम : 01. सेवाधारी यांचा विनंती अर्ज असावा. 02. गांवातील सरपंच रहिवासी दाखला असावा. 03. सेवाधारी यांच्याकडे पोलीस पाटील यांचा वर्तणूक दाखला असावा. 04. सेवा करण्यासाठी इच्छुक व्यक्तीची वयोमर्यादा 21 ते 40 पर्यत असावी. 05. त्यांना धार्मिकतेची आवड असावी. त्यांना कुठलेही व्यसन नसावे.