आध्यात्मिक केंद्र

श्रीं’च्या कृपाशिर्वादाने, श्री क्षेत्र शेगांवच्या पुण्यभूमीवर विकसित झालेले आनंदसागर आध्यात्मिक केंद्र सुमारे 250 एकरच्या विस्तीर्ण परिसरात आहे. या भूमीमध्ये, निसर्गाचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संतुलन या मुलभूत व अत्यावश्यक गरजांचा विचार सर्वोच्च मानून हजारो वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. येथे श्री संस्थेच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन व जलसंवर्धनाद्वारे पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे, आनंदसागर आध्यात्मिक केंद्राच्या हिरवाईने नटलेल्या परिसरामध्ये भक्तांना निसर्ग आणि अध्यात्म यांचा दिव्य संगम अनुभवतांना शांतता, प्रसन्नता आणि पवित्रतेचा अनुभवही प्राप्त होतो.

आध्यात्मिक केंद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भक्ताला मनःशांतीचा लाभ व्हावा, मनातील सश्रद्ध भक्तिभाव जागृत व्हावा आणि त्यासोबत, ध्यानधारणेच्या माध्यमातून त्याच्यातील अंतर्गत चैतन्यही प्रगट व्हावे, या उद्देशाने या आध्यात्मिक केंद्रामध्ये श्री शिव मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री नवग्रह मंदिर या मंदिरांसोबतच ‘श्रीं’चे ध्यानमंदिरही साकारलेले आहे.

आनंदसागर आध्यात्मिक केंद्र परीसर नव्याने पुनर्निर्मीत केला जात आहे. लवकरच येथे, श्री विष्णू मंदिर आणि श्री कालीमाता मंदिर या देवालयांचे तेजोमय रुपस्वरूपही भक्तांसाठी साकार होत आहे.

प्राचीन भारतीय संस्कृती, गौरवशाली संतपरंपरा आणि महान आध्यात्मिक वारसा यांचा सन्मान व संवर्धन व्हावे या विचारातून श्री संस्थेने भारताच्या विविध राज्यांतील प्रमुख संतश्रेष्ठांचे मूर्तीरुप श्री संतमंडपात प्रतिष्ठापित केले आहे. संतमहात्म्यांच्या पुण्य स्मृती जागृत राहाव्या या सद्हेतूने निर्माण केलेल्या या श्री संतमंडपास भेट देणाऱ्या भक्तांना संतांच्या विचारस्मृतीत राहून चिंतन, मनन आणि आध्यात्मिक उन्नती साधता येईल अशी श्री संस्थेची धारणा आहे.

श्री संत मंडपामध्ये श्री भीमा भोई (ओरीसा), श्री धुनिवाले दादाजी (मध्यप्रदेश), श्री तिरुवल्लूर (तामीळनाडू), श्री मिराबाई (राजस्थान), श्री जलारामबाप्पा (गुजराथ), भगवान महावीर (बिहार), श्री विष्णूतीर्थ (हरियाणा), श्री आद्य शंकराचार्य (केरळ), श्री माणिकप्रभू महाराज (कर्नाटक), श्री मदर मेरी (नाझरेथ), श्री ताजुद्दीन बाबा (महाराष्ट्र), श्री गोरखनाथ, श्री राघवेन्द्र स्वामी (कर्नाटक), श्री रमण महर्षी (अरुणाचल), श्री भगवान गौतमबुध्द (बिहार), श्री कबीर (उत्तरप्रदेश), श्री तुलसीदास (उत्तरप्रदेश), श्री स्वामी रामतीर्थ (राम बादशहा) (पंजाब) यांच्या मूर्ती आणि बोधप्रद वचने उद्धृत केलेली आहेत.

आनंदसागर आध्यात्मिक केंद्र परिसरामध्ये शांतता, पावित्र्य आणि सात्विकता यांचेे अधिष्ठान असून, येथे येणाऱ्या प्रत्येक श्रद्धावान भक्ताला आत्मिक समाधान, स्थिरता आणि अद्भुत शांततेचा प्रत्यय येतो.