सेवार्थ नि:शुल्क पार्किंग व्यवस्था आम्ही कोणतेही ऑनलाइन रूम बुकिंग स्वीकारत नाही श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे

वारकरी भक्तनिवास संकुल

वारकरी भक्तनिवास संकुल

सेवाभावी धर्मपरायण व्यवस्थेच्या विचाराला पूरक ठरणारी व ‌‘श्रीं‌’च्या अन्योन्य साहाय्यकारी सेवाभाव परंपरेची जपणूक करणारी पद्धती वारकरी भक्तनिवास संकुलामध्ये प्रतिबिंबित झालेली आहे. ‌‘श्रीं‌’चे चरणी नतमस्तक होणाऱ्या प्रत्येकाची मनोभावे सेवा करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सेवासुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असलेल्या श्री संस्थेच्या वतीने ‌‘श्रीं‌’च्या समाधी मंदिरापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर ‌‘वारकरी भक्तनिवास संकुल‌’ उभारण्यात आले आहे.

‌‘श्रीं‌’चे चरणी येणारे नित्य वारी करणारे वारकरी, पारायणार्थी भक्त, साधू-संन्यासी, वयोवृद्ध तसेच दिव्यांग भाविकांची सोय हीच खरी सेवा हे ब्रीद अंगिकारलेल्या श्री संस्थेने या ‌‘वारकरी भक्तनिवास संकुल‌’ परिसरामध्ये 02 भक्त निवास उभारले आहेत. येथे भक्तांसाठी स्वच्छ, शांत व सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध आहे.

येथे आलेल्या भाविकांना सकाळी अल्पोपाहार तसेच रात्रौ 10 ते 12 या कालावधीत विनामूल्य महाप्रसाद सेवा दिली जाते. येथे दर्शनार्थीं करीता लॉकर, प्रथमोपचार केंद्र, पार्किंग तसेच स्नान व प्रसाधनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जे भक्त चालण्यास असमर्थ आहेत त्यांच्या सेवेसाठी, श्री मंदिर ते वारकरी भक्तनिवास संकुल या दरम्यान येणे-जाणे सुलभ व्हावे याकरिता ई-रिक्षा सेवा उपलब्ध आहे.

संकुलामध्ये श्री पारायणार्थी, दिव्यांग, साधना मार्गदर्शित साधक, साधुसंत, स्वतंत्र महिला आणि स्वतंत्र पुरूष भाविक, दिव्यांग, कॉट-बेड धारक, वयोवृद्ध नागरीक, अस्वच्छ वेषधारी पुरूष आणि महिला व इतर संयुक्तिक श्रेणीतील भाविक अशा सर्वांचेच विनम्रतेने स्वागत करून त्यांच्या गरजेनुसार सुरक्षित व शिस्तबद्ध निवासाची व्यवस्था करण्यात येते. संकुलातील कॉट-बेड व्यवस्था, प्रथमोपचार केंद्र, विश्रांतीधारक व बाळांसाठी रेक्झीन अंथरूण व्यवस्था या सर्वांची काळजी घेतली जाते.

येथे वास्तव्यास असलेल्या भाविकांना त्रास होऊ नये या करिता रात्री 9.30 नंतर प्रवेशासाठी विशेष परवानगी योजना आणि रात्रौ 10 नंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वितरण आदी सेवाकार्ये येथे सातत्याने कार्यरत असतात.

ही सर्व व्यवस्था ‌‘श्रीं‌’च्या कृपेने भाविकांच्या सोयीसाठी अविरत कार्यरत आहे. वारकरी भक्तनिवास संकुलातील प्रत्येक व्यवस्था ही भाविकांची म्हणजे ‌‘श्रीं‌’ची सेवा या दैवी संकल्पनेवर आधारित आहे. येथे येणाऱ्या सर्व भाविकांचा थकवा दूर होऊन त्याच्या मनाला शांती लाभावी तसेच ‌‘श्रीं‌’च्या अनुभूतीचा प्रत्यय व प्रचिती लाभावी यासाठी सेवेकरी दक्ष असतात. शुचिता, शिस्त, भक्ती, नम्रता आणि मानवतेचे मूल्य जपत येथील प्रत्येक सेवा कार्यरत आहे.