संतसत्पुरुषांच्या मांदियाळीमध्ये असणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजेच, शेगांवचे श्री गजानन महाराज. श्रींनी त्यांच्या अवतारकार्याद्वारे अध्यात्ममार्गाचे पुनरुत्थान तर केलेच शिवाय भोळ्याभाबड्या सांसारिक जीवांना भावभक्तीचा लळाही लावला. आपल्या विविध लीलांमधून त्यांनी परमेश्वरीय तत्त्वाचा प्रत्यय दाखविला आणि वारी, दिंड्यांच्या माध्यमातून तो रुजविला देखील!
श्री गजानन महाराजांनी जोपासलेला आध्यात्ममार्ग नजरेसमोर ठेवून संस्थानच्या आध्यात्मिक क्षेत्रातील सेवाकार्याची वाटचाल होत आहे. वारकरी संप्रदायाची जोपासना व जडणघडण करीत असतानाच संस्थानद्वारा वारकरी शिक्षण संस्थेसारख्या अद्वितीय अभ्यासक्रमातून ‘उद्याचा वारकरी‘ घडविला जात आहे. यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न आणि त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य याद्वारे संस्थानचे आध्यात्मिक कार्य जोमाने साकार झाल्याचे दिसून येते.
