
श्री संस्थेमध्ये वारकरी संस्थेच्या नित्यनियमानुसार दररोज सकाळी 05.00 (काकडाआरती), दुपारी 04.00 ते 05.00 (श्री ज्ञानेश्वरी प्रवचन) सायंकाळी 05.00 ते 06.00 (हरीपाठ) रात्री 08.00 ते 09.00 (पंचपदी भजन) रात्री 08.00 ते 10.00 (कीर्तन - गुरूवार, दशमी, एकादशी, उत्सव प्रसंगी) या नुसार कार्यक्रम पार पडतात. श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा गुरूवार आणि दशमीला सायंकाळी 05.00 ते 06.00 या वेळात संपन्न होते.
श्री संस्थेमध्ये प्रामुख्याने ‘श्रीं’चा प्रगटदिनोत्सव, श्रीराम जन्मोत्सव तसेच ‘श्रीं’चा पुण्यतिथी उत्सव हे तीन महत्त्वाचे उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतात.
त्यासोबतच, विविध देवदेवता आणि संतश्रेष्ठांचे जयंती व पुण्यतिथी उत्सव, श्री नवरात्रोत्सव, श्री जन्माष्टमी, श्रीमद् भागवत सप्ताह, श्री अधिकमास, श्री श्रावणमास इत्यादी पारंपरिक उत्सवही संपन्न होतात. साधारणत: वर्षभरात श्री क्षेत्र शेगांव तसेच श्री संस्थेच्या सर्व शाखांमध्ये 300 श्रीहरी कीर्तने आणि 900 श्री ज्ञानेश्वरी प्रवचने होतात. त्याचप्रमाणे, अधिकमास आणि श्रावणमास या कालावधीत संपूर्ण महिनाभर कीर्तन, प्रवचनादी कार्यक्रमही संपन्न होतात.
‘श्रीं’चा आषाढी वारी पालखी सोहळा
श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी वारीकरीता पालखीसोबत वारकरी निघतात. दडीमध्ये सहभागी झाल्याने विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्त्वांचा बोध होतो. आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन ध्ार्माविषयीच्या श्रद्धा, भावना वृद्धिंगत होतात. लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रभाव पडण्यास मदत होते. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा विविध समस्यांनी गांजलेली विविध खेडी-गावे पायीवारीच्या मार्गावर आहेत. या गावांमध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवनमान अधिक सुखकर करणे, त्यांच्यातील व्यसनाधिनता, अंधश्रद्धा दूर करणे हे या वारीमागचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे.
श्री क्षेत्र शेगांव येथे वर्षभर येणाऱ्या भजनी दिंड्या
‘श्रीं’च्या उत्सवकाळाप्रमाणेच श्रीक्षेत्र शेगांव येथे वर्षभर विविध भजनी दड्यांचे आगमन होत असते. श्री संस्थेकडून दिंड्यांचे स्वागत करण्यात येते. वारकरी निवास, विसावा संकुल येथे दड्यांसाठी भोजनप्रसाद व निवासव्यवस्था करण्यात येते. दिंडीतील वारकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा श्री संस्थेकडून देण्यात येतात. ‘श्रीं’च्या उत्सवांप्रमाणेच, श्री संस्थेकडून दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्तीसाठी अंशदान दिले जाते. वारकरी भक्तांच्या नामसाधनेत खंड पडू नये, त्यांच्या सेवेत सातत्य राहावे ही भावना मनात ठेवून ही अंशदान सेवा अविरत सुरू असते.




