संकल्पना  : श्री संस्थेद्वारे 42 सेवाकार्यांपैकी ‌‘भजनी दड्यांना भजनी साहित्य वितरण‌’ या सेवाकार्यांतर्गत साहित्य वितरण केले जाते. श्री क्षेत्र शेगांव येथे ‌‘श्रीं‌’चा प्रगटदिनोत्सव, श्रीराम जन्मोत्सव तसेच ‌‘श्रीं‌’चा पुण्यतिथी उत्सव या उत्सवाच्या प्रसंगी तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर शाखा (आषाढी-कार्तिकी वारी) श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखा (पौष-वद्य वारी), श्रीक्षेत्र आळंदी शाखा (कार्तिक-वद्य वारी) मध्ये भजनी साहित्याचे वितरण करण्यात येते.

या उत्सव प्रसंगी विविध भागातून आलेल्या भजनी दड्यांना 10 टाळजोड, 01 विणा, 01 मृदंग, 01 हातोडी तसेच संत वाङ्मय (श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत) अशा साहित्याचे वितरण करण्यात येते. आजपावेतो श्री क्षेत्र शेगांवसह श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या शाखेतील सेवाकेंद्रावर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश अशा 05 प्रांतातील 71 जिल्ह्यातून आलेल्या 20,898 गावांना भजनी साहित्य व संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले आहे.

भजनी साहित्य प्राप्त झालेल्या प्रत्येक गावांमध्ये संप्रदायाच्या नियमाप्रमाणे दररोज नित्य हरिपाठ, भजन, काकडारती, दशमीची दडी परिक्रमा, कीर्तन-प्रवचनादी कायक्रम व्हावेत तसेच त्या सर्व कार्यक्रमांमध्ये एकसुत्रता यावी या हेतूने ‌‘वारकरी प्रशिक्षण शिबीर‌’ हा उपक्रम श्री संस्थेद्वारे सुरू केला.

या शिबिराचा प्रशिक्षण कालावधी एक महिन्याचा असून मुलांची नि:शुल्क निवास, भोजनादी व्यवस्था श्री संस्थेकडून केली जाते.

श्री संस्थेत संपन्न होणाऱ्या तीन प्रमुख उत्सवांमध्ये सहभागी होणाऱ्या भजनी दड्यांमधून वरील पात्रता त्याचप्रमाणे इच्छुक असलेल्या प्रत्येक दडीतील कमीतकमी 10 विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची मुलाखत घेतल्यानंतर, वारकरी प्रशिक्षण शिबिराकरीता त्यांची निवड केली जाते. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थ प्रवेश दिला जातो आणि प्रशिक्षण संपल्यानंतर या प्रशिक्षणार्थींना ‌‘वारकरी प्रशिक्षण शिबीर‌’ प्रमाणपत्र, 1500 रू. शिष्यवृत्ती आणि भेटवस्तू दिल्या जातात.

आजपावेतो 151 शिबीर-सत्रे संपन्न झाली आहेत. या शिबिरांमधून 6,897 प्रशिक्षणार्थींनी ‌‘वारकरी प्रशिक्षण‌’ घेतले आहे. त्यांनी त्यांच्या प्रशिक्षणातील सद्गुणांचा आणि आचरणाचा अवलंब केल्यामुळे त्यांच्या गावांमध्येही परिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे. (टिप : या शिबिरांमध्ये प्रशिक्षकांकडून प्रवचन, कीर्तन, मृदंग वादन, गायन यांसोबत सहिष्णू वृत्तीचेही शिक्षण दिले जाते.)