
श्री संस्थेद्वारा संचालीत वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना वै.ह.भ.प. मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते सन 1967 मध्ये करण्यात आली. संत वाङ्मयातील तत्वज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हावा, जनमानसांमध्ये भागवतभक्तीची, नितिधर्माची ज्ञानज्योत तेवत राहून समाजाला स्वदेश-स्वभाषा विषयीच्या कर्तव्यांची जाणीव व्हावी, समाज व्यसनमुक्त व्हावा-व्यसनमुक्त राहावा, समाजाच्या सर्व घटकांमध्ये बंधुभाव, सद्प्रवृत्ती नांदावी, समाजावर पारमार्थिक संस्कार घडावे हा वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. या संस्थेत शिक्षण घेतलेल्या कीर्तनकार, प्रवचनकार मंडळींनी ज्ञान-प्रबोधनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे आत्मकल्याण साधावे हा सद्उद्देशही वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्यामागे आहे.
विद्यार्थी प्रवेश आणि पात्रता : साधारणतः श्री रामनवमी उत्सवानंतर एप्रिल-मे या कालावधीत वर्ग आठवी ते दहावी उत्तीर्ण झालेल्या आणि 14 ते 20 वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश दिला जातो. संस्थेच्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांचे घरातील वातावरण संस्कारसंपन्न व धार्मिक वृत्तीचे असावे तसेच संत शिकवणीनुसार विद्यार्थ्यांनी तुळशीमाळा धारण केलेली असावी याकडे कटाक्षाने पाहिले जाते.
निवास-भोजन-गणवेष व्यवस्था : वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास, भोजन, गणवेष, ग्रंथ, स्टेशनरी, आदी सर्व व्यवस्था श्री संस्थेमार्फत सेवार्थ केली जाते.
अभ्यासक्रम व शैक्षणिक कालावधी : वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम 04 वर्षाचा असून विद्यार्थ्यांना संतवाङ्मय पाठांतर, संस्कृत व्याकरण, नारदभक्ती सूत्र, श्रीमद् भगवदगीता, विचारसागर, पंचीकरण, श्री ज्ञानेश्वरी, प्रवचन, कीर्तन, वारकरी भजन, मृदंग वादन आदी विषयांचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाते. सोबतच, उपजिविकेचे साधन म्हणून विद्यार्थ्यांना याच कालावधीमध्ये शिवणकाम (शिलाई मशिन) आदी शिक्षणही दिले जाते.
अध्यापक वर्ग : वारकरी शिक्षण संस्थेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 14 अध्यापक सेवक आहेत. त्यांनी संप्रदायाच्या नियमानुसार विविध क्षेत्री ज्ञानार्जन करून पदविका प्राप्त केलेली आहे.
परीक्षा पध्दती : वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहामाही आणि वार्षिक अशा वर्षातून दोन परीक्षा संपन्न होतात. चार वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री संस्थेकडून प्रमाणपत्र देण्यात येते.
विद्यार्थी संख्या : आज, विविध भागातून आलेले 100 विद्यार्थी वारकरी शिक्षण प्राप्त करीत आहेत. वारकरी शिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेले अनेक गुणीजन विद्यार्थी विविध भागात वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार उत्तमप्रकारे करीत आहेत. सन 1967 ते 2025 या कालावधीत 2480 विद्यार्थ्यांनी श्री संस्थेमध्ये शिक्षण घेतले. त्यापैकी उत्कृष्ट प्रवचनकार, मृदंगवादक, गायक असे 700 हून अधिक विद्यार्थीं तयार झाले. यांतील 300 हून अधिक विद्यार्थी उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून कार्यरत आहेत.
दैनंदिन दिनचर्या : पहाटे 05 (प्रात:विधी,स्नान), सकाळी 06 (काकडा-आरती), सकाळी 07 (श्रीविष्णुसहस्त्रनाम), सकाळी 08 ते 11 (पाठ), सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 (भोजन), दुपारी 12 ते 03 (विश्रांती), दुपारी 03 ते 05 (पाठ), सायं. 05 ते 06 (हरीपाठ), सायं. 06 ते 07 (भोजन), रात्री 08 ते 9.30 (अभ्यास) आणि रात्री 9.30 नंतर (विश्रांती)
