शेगांवचा इतिहास

पूर्वकाळी गर्ग व श्रृंग या मुनिश्रेष्ठांनी ज्या भूमीवर तपश्चर्या केली, त्याच पावनभूमीवर निरंतर वास्तव्यासाठी एक गावही वसविले जे, ‌‘श्रृंग‌’गाव म्हणून प्रसिद्धीस आले. पुढील काळात ही पुण्यभूमी, येथील प्राचीन शिवालयांमुळे ‌‘शिव‌’गाव म्हणूनही ओळखली गेली. मात्र कालांतराने, श्रृंगगाव अथवा शिवगाव या नावांचाही अपभ्रंश होऊन जनसामान्यांमध्ये ‌‘शेगांव‌’ हेच नाव रुढ झाले.

मात्र आज ‌‘शेगांव‌’ ही पुण्यभूमी, येथे प्रगट झालेल्या व येथेच समाधिस्थ झालेल्या संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराज यांच्या पवित्र पावन वास्तव्यामुळे देश-विदेशांत, सर्वत्र ‌‘संतनगरी‌’ या गौरवपूर्ण नामोल्लेखाने प्रसिद्ध आहे, सुपरिचित आहे.
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव या छोट्याशा खेडेगांवात माघ वद्य सप्तमी, दि. 23 फेब्रुवारी 1878 रोजी श्री महाराज प्रगट झाले आणि...

भाद्रपद शुद्ध पंचमी, (ऋषीपंचमी) दि. 08 सप्टेंबर 1910 या दिवशी शेगांव येथेच समाधिस्थ होऊन अवतारकार्य पूर्ण करते झाले.

‌‘श्रीं‌’च्या अवतारकार्यातील 32 वर्षांचे वास्तव्य शेगांवच्या पुण्यप्रद भूमीत घडले. या समग्र कालावधीत परब्रह्मस्वरुप, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अशा ‌‘श्रीं‌’च्या दिव्यत्वाची अनुभूती आणि ईश्वरीय तत्त्वाचा साक्षात्कार अगणित भक्तजनांनी घेतला. आजही, ‌‘श्रीं‌’च्या चिरंतन, शाश्वत अस्तित्वाची प्रचिती लाखो भक्तजन तितक्याच उत्कटतेने आणि समर्पित श्रद्धाभावनेने घेत आहेत.

‌‘श्रीं‌’चा चरणस्पर्श व संजीवन वास्तव्य यांमुळे शेगांवच्या पुण्यभूमीत समृध्दीची गंगा, भावभक्तीची यमुना आणि ज्ञानरूपातील सरस्वती सातत्याने वाहत आहे. विशेष म्हणजे...

‌‘श्रीक्षेत्र‌’ शेगांवचा उल्लेख सर्वत्र एकमुखाने ‌‘विदर्भाची पंढरी‌’ असा केला जातो.

शेगांवचा इतिहास
श्री संस्थेचा इतिहास

श्री संस्थेचा इतिहास

श्रीगजानन महाराज संस्थान (शेगांव)

दि. 12 सप्टेंबर 1908 रोजी, श्री गजानन महाराजांचे यथोचित स्मारक व्हावे या मूळ उद्देशाने प्रेरीत होऊन ‌‘श्रीं‌’चे समक्ष, 12 विश्वस्तांच्या एकमताने ‌‘श्रीगजानन महाराज संस्थान, शेगांव‌’ ही विश्वस्त संस्था स्थापन झाली.

श्री महाराज देहावतारात साक्षात असतांना त्यांच्या समक्ष ‌‘श्री‌’संस्थेची स्थापना झाली, ही अत्यंत अलौकीक आणि वैशिष्टयपूर्ण ‌‘घटना‌’ आहे.

श्री महाराजांनी ज्या जागेकडे निर्देश करुन ‌‘या जागी राहील रे‌’ असे सांगितले त्याच जागी पुढे ‌‘श्रीं‌’चे समाधी मंदिर उभारण्यात आले.

‌‘श्रीं‌’च्या तत्कालीन परमभक्तांकडून, कै. नारायण कडताजी पाटील, यांच्या शेगांव येथील अडत दुकानावर ‌‘श्रीं‌’चे भक्त तसेच शेगांवचे ग्रामस्थ अशा सर्वांची एक संयुक्त सभा आयोजित करण्यात आली.

आश्विन शुद्ध प्रतिपदा दि. 27/09/1908 रोजी ‌‘श्री‌’ संस्थानातील सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्याकरिता ‌‘श्री‌’ संस्थेचे पहिले कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले. अल्पावधीत, वाडेगांव-बाळापूर परिसरातून आणलेल्या काळ्या पाषाणांतून नागपूर येथील शिल्पकार कै. किसन मिस्त्री व कै. खंडू मिस्त्री यांनी अत्यंत आखीव-रेखीव स्वरुपातील कोरीव शिल्पकलेशी समन्वय साधून भव्य सभामंडप आणि ‌‘श्रीं‌’चे समाधी मंदिर निर्माण केले.

सन 2010 मध्ये ‌‘श्रीं‌’च्या समाधी शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून ‌‘श्रीं‌’च्या समाधी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. भक्तजनांची वाढती गर्दी व आगामी काळाची नेमकी गरज ओळखून श्री संस्थेने संगमरवरी दगडी बांधणीतील ‌‘श्रीं‌’च्या समाधी मंदिराचे पुनःनिर्माण केले.

श्रीगजानन महाराज संस्थान (शेगांव)

श्रीगजानन महाराज संस्थान (शेगांव)

आजमितीस श्री संस्थेकडून, ‌‘श्रीं‌’च्या समक्ष व त्यांनीच घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन अतिशय काटेकोरपणे केले जाते. ‌‘श्रीगजानन महाराज संस्थान‌’ या विश्वस्त संस्थेचे कार्य ‌‘श्रीं‌’च्या वचनांस अनुसरुन पूर्णतः मानवसेवा केंद्रित आहे. श्री दर्शनार्थ येणाऱ्या समस्त भक्तजनांस दर्शन, प्रसाद आणि निवास यांचे द्वारे उत्तम सेवा देण्याकरिता ‌‘श्री‌’संस्था कायम अग्रेसर असते.

श्रीभक्तांना ‌‘श्रीं‌’च्या दर्शनाचा लाभ व्यवस्थितपणे उत्तमप्रकारे घेता यावा यासाठी श्री संस्था सतत तत्पर व कार्यरत असते.

स्त्री व पुरुष भक्तांकरिता श्री दर्शनासाठीचे नियम अथवा, पैशाला स्पर्श करु नका, पैशाचा संचय होऊ देऊ नका, यात्रा थांबू देऊ नका असे महत्वपूर्ण नियम जे ‌‘श्रीं‌’नी पूर्वापार घालून दिले आहेत ते आजही, श्री संस्था विविध सेवाकार्यांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेत आहेे. कुण्या भक्तांस श्री महाराजांचे दर्शन घेणे आहे कवा महाराजांस नैवेद्य अर्पण करणे आहे, त्यांनी (स्त्री असो वां पुरूष) गाभाऱ्याच्या बाहेरूनच श्रीदर्शन घ्यावे तसेच नैवैद्यही बाहेरूनच दाखवावा. ‌‘श्रीं‌’च्या समाधी मंदिर गाभाऱ्यात जाऊन तेथील पावित्र्य भंग करु नये हा नियम तेव्हापासून, अगदी आजपावेतो अत्यंत कसोशीने पाळला जात आहे.

श्री संस्थेच्या स्थापनेपासून आजपावेतो, सर्व ठराव कोणत्याही विश्वस्तांचे दुमत न होता एकमताने मंजूर झाले आहेत ही देखील वैशिष्टयपूर्ण ‌‘बाब‌’ आहे.

श्री महाराजांनी त्यांच्या अवतारकार्यामध्ये गुरू, शिष्य तसेच गादी परंपरेचा पुरस्कार कधीही केला नाही. या कारणाने, श्रीक्षेत्र ‌‘शेगांव‌’ येथे वर्षानुवर्षे सेवेची व सेवाकार्याची आगळीवेगळी परंपरा आजही सुरु आहे व श्रीकृपेने पुढेही सुरु राहील.

श्रीगजानन महाराज संस्थान (शेगांव)
श्री संस्थेचे कार्य : ध्येय, उद्देश आणि कार्यपद्धती

श्री संस्थेचे कार्य : ध्येय, उद्देश आणि कार्यपद्धती

ध्येय : भक्ती आणि सेवाभावनेने प्रेरित झालेल्या श्री संस्थेचे ध्येय ‌‘श्रीं‌’च्या मंदिरापुरतेच मर्यादित नसून, समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दर्शविणारे आहे. यातून निर्माण होणारे सेवाकार्य ‌‘श्रीं‌’च्या कृपेने पूर्णत्वाला जात आहे. * भक्तांच्या अंतःकरणात श्रद्धा, प्रेम, संयम व सत्य निष्ठा यांचा सेवाभाव तेवत ठेवून ‌‘श्रीं‌’चे तत्त्वज्ञान सर्वत्र पोहोचविणे. * विनम्रभावे केलेली सेवा हीच ‌‘खरी साधना‌’, या भावनेतून प्रत्येक गरजू, पीडित आणि दीनजनांच्या सेवेत तत्पर राहणे. * विद्यादान हेच श्रेष्ठदान, या उक्तीनुसार विद्यार्थ्यांकरिता गुणवत्तापूर्ण, संस्कारयुक्त असे सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करणे. * रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा, या उक्तीनुसार आरोग्यसेवेद्वारे सर्वसामान्य जनतेच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे रक्षण करणे. * जात, धर्म, भाषा या कक्षेपलीकडे सर्वांना समानतेने स्वीकारणे आणि समाजामध्ये ऐक्य, प्रेम आणि बंधुभाव दृढ करणे. * निसर्गाला परमेश्वराचे रुप मानून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे तसेच सर्वत्र स्वच्छतेचा संदेश पसरविणे. * भक्तांमध्ये आत्मनिर्भरता, प्रामाणिकता आणि परोपकार वृत्ती जागृत करून समाजसेवेला त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनवणे.

उद्देश : ‌‘श्रीं‌’च्या प्रेरणेने व कृपाशिर्वादाने स्थापन झालेली श्री संस्था ही केवळ धार्मिक केंद्र नसून श्रद्धा, सेवा, साधना आणि समर्पणाचे मूर्तिमंत रुप आहे. समाजात श्री भक्ती, आत्मशांती आणि सेवाभावनेचा प्रसार करणे हा श्री संस्थेचा मूळ उद्देश आहे. शिक्षण, आरोग्य, अन्नदान, अध्यात्मप्रसार, गरजूंना मदत करणे यांसारखी विविध लोककल्याणार्थ सेवाकार्ये निःस्वार्थ भावनेने करणेे हे श्री संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‌‘सेवेमध्ये साधना व साधनेमध्ये ईश्वरप्राप्ती‌’ या विचाराने प्रेरित होऊन प्रत्येक सेवक, सेवाधारी, विश्वस्त व भक्त आपापल्या कृतीतून ‌‘श्री‌’ कार्याला वाहून घेतो. या सर्वांच्या नित्य जगण्यात श्रद्धा वाढविणे, समाजात सद्भावना निर्माण करणे आणि मानवतेच्या कल्याणासाठी अखंड कार्यरत राहणे हे देखील श्री संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सेवेची परंपरा : श्री संस्थेच्या सेवाकार्याचा आत्मा भक्तसेवेच्या परंपरेमध्ये दिसून येतो. प्रत्येक भक्तांमध्ये ‌‘श्रीं‌’चे रूप पाहून ‌‘या भक्तांची सेवा म्हणजेच ‌‘श्रीं‌’ची सेवा‌’ हे श्री संस्थेचे मुख्य ध्येय आहे. श्री भक्तांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांच्याकरिता सेवासुविधा निर्माण करणे आणि त्यांना अध्यात्ममार्गावर येण्यासाठी प्रेरीत करणे ही या सेवाभावनेमागील व्याख्या आहे. श्री संस्थेचे सेवक, सेवाधारी आणि विश्वस्त निःस्वार्थ भावनेने भक्तसेवेसाठी तत्पर असतात. दर्शनव्यवस्था, निवास, भोजनप्रसाद, आरोग्यसेवा, शिक्षणादी विभागांतून ही सेवा अखंड कार्यरत असते. या करिता, श्री संस्थेने विविध ठिकाणी सेवाकेंद्रांची स्थापना केली असून, ही सर्व केंद्रे ‌‘श्रीं‌’च्या कृपाशिर्वादाने नित्य कार्यरत आहेत. प्रत्येक सेवाकेंद्र भक्तांना आध्यात्मिक प्रेरणा देणारे आणि निःस्वार्थ सेवेचा अनुभव देणारे पवित्र स्थान आहे. या सर्वच केंद्रांतून अन्नदान, शिक्षण, आरोग्यसेवा, धार्मिक उपक्रम, धर्मप्रसार आणि समाजकल्याणाचे कार्यक्रम नियमित संपन्न होतात व ‌‘सेवेमध्ये साधना, साधनेत ईश्वरप्राप्ती‌’ ही उक्तीदेखील सार्थ करतात.

कार्यपद्धती ः श्री संस्थेची कार्यपद्धती श्रद्धा, शिस्त, सेवा आणि समर्पण या चतुःसुत्रीवर आधारीत आहे. श्री संस्थेचे प्रत्येक कार्य ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून आध्यात्मिक साधन आहे असे मानले जाते. सेवक, सेवाधारी आणि विश्वस्त असे सर्वजण समाजहितासाठीचे आपले योगदान निःस्वार्थ भावनेने देतात. श्री संस्थेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या गुणांना सर्वोच्च स्थान आहे. प्रत्येक विभाग हा ‌‘श्रीं‌’च्या प्रेरणेने तसेच नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत आहे. नित्यनेमाच्या कार्यातही शिस्तबद्ध सेवा, भक्तांचा सन्मान आणि ‌‘श्रीं‌’चे चरणी समर्पणभाव यांचा सुंदर संगम दिसून येतो. ‌‘सेवा हीच साधना आणि भक्तिभाव हीच प्रेरणा‌’ या तत्त्वावर आधारित कार्यपद्धतीमुळे श्री संस्था आज भक्तजनांसाठी आदर्शवत श्रद्धास्थान बनलेली आहे.

ब्रीदवाक्य : श्री संस्थेचे ब्रीदवाक्य ‌‘सर्वे भवन्तु सुखिनः‌’ आहे. हा केवळ एक शब्दसमूह नसून, ‌‘श्रीं‌’च्या करुणामय जीवनकार्याचे मर्म आहे. बृहदारण्यक उपनिषदातील हा मूळ शांतीमंत्र अन्य पुराण, वाड्मयांमध्येही आढळतो. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी येवो आणि सर्वांना चिंतारहीत निरोगी आरोग्याची प्राप्ती होवो अशी मंगलमय कामना करणारा हा मंत्र आहे. सर्व जगताचे मंगल होवे, भले होवो असा आशावाद प्रगट करणारे वचन श्री संस्थेने ‌‘ब्रीदवाक्य‌’ म्हणून स्वीकारले आहे. मानव कल्याणार्थ सदैव तत्पर असलेल्या श्री संस्थेने हाच आशावाद सेवाकार्याच्या माध्यमातून भक्तजनांपर्यंत पोहोचविलेला आहे. येथे दर्शनार्थ आलेल्या भक्तांच्या धर्म, जात वां स्थितीची विचारणा न करता त्यांच्याविषयी आदरभाव राखून ‌‘भक्तांचा आनंद हेच श्री सेवेतील खरे पुण्य‌’ या भावनेने स्वागत केले जाते.

बोधचिन्ह

बोधचिन्ह : श्री संस्थेच्या बोधचिन्हावर शिरोभागी ‌‘सर्वे भवन्तु सुखिनः‌’ हे ब्रीदवाक्य आहे. त्यासोबतच बोधचिन्हामध्ये श्री महाराजांचे चित्रही विराजमान आहे. श्री संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य स्त्रोत श्री महाराज आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा हेच या बोधचिन्हाचे मुख्य व ठळक रुप आहे. सद्गुरुतत्त्व हे विधीहरिहर (ब्रह्मा-विष्णू-महेश) या त्रयसूत्रीचे सगुणरुप मानले जाते. या कारणाने, श्री महाराजांमधील सद्गुरुतत्त्व प्रगट करतांना, ब्रह्मा-विष्णू-महेश याही देवता प्रतिकरुपाने समाविष्ट केलेल्या आहेत.

प्रतिके व अर्थ : श्रीसंस्थेच्या बोधचिन्हांमध्ये असलेल्या प्रतिकात्मक चिन्हांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

सर्व जगताचे मंगल होवो, भले होवो हा आशावाद ‌‘सर्वे भवन्तु सुखिनः‌’ या वचनाद्वारे प्रगट झाला आहे. हे वचन उर्जादायक ‌‘केशरी‌’ रंगात आहे. या बोधवाक्यातील ‌‘स्वस्तिक‌’ हे चिन्ह ब्रह्मरुपाचे तत्त्व आणि समृद्धी-सौभाग्य-शुभ-शांतीचे प्रतिक आहे. स्वस्तिकाच्या चारही बाजू वेद, दिशा आणि पुरुषार्थ यांचे प्रतिक आहेत. शुभकार्यामध्ये हे सौभाग्यचिन्ह आवर्जून रेखाटले जाते म्हणूनच बोधवाक्याच्या प्रारंभी व अखेरीस ‌‘स्वस्तिक‌’ चिन्हाचे प्रयोजन योजलेले आहे.

‌‘ओंकार‌’ हा मूळ अनाहत नाद असून विश्वाचे हुंकाररुपाने झालेले पहिले उच्चारण आहे. अ(ब्रह्मा), उ(विष्णू) आणि म(महेश) यांचे हे प्रातिनिधिक रुप आहे. चराचरसृष्टीचे प्रतिक आणि निर्गुण निराकार ब्रह्माचे सनातन अव्यय अविनाशी रुप या अर्थाने हे ओंकार रुप ‌‘श्रीं‌’च्या मागील बाजूस स्थिर स्वरुपात व फिकट निळसर रंगात आहे. मागे गडद होत जाणारा निळा रंग शांतता व अवकाशाची विस्तीर्ण खोली दर्शवतो. श्रींची स्थिर आणि कारुण्यमयी दृष्टी तसेच, त्यांची शांत-निश्चिंत प्रकृती यांना उठाव देणाऱ्या रंगसंगतीस दर्शविणारा निळा रंग हा पंचमहाभूतातील जलतत्त्वाला आणि आकाशतत्त्वालाही प्रगट करणारा आहे.

बोधचिन्हाच्या खालील तसेच वरील बाजूस असलेले ‌‘कमळ‌’ हे ज्ञान, सौंदर्य, पावित्र्य, समृद्धी, अनासक्ती, निर्लेपता यांचे प्रतिक आहे सोबतच ब्रह्मा-विष्णू-लक्ष्मी या देवतांचेही आणि स्थैर्याचेही प्रतिक आहे. सर्व जगताला स्थैर्य प्रदान करणाऱ्या ‌‘श्रीं‌’चे आसन म्हणून कमळाचे प्रतिक योजलेले आहे. हेच कमळ बोधचिन्हाच्या शिरोभागी असून यामध्ये चिरंतन व शाश्वत असे शिवतत्त्व ‌‘त्रिपुंड‌’रुपाने साकारले आहे. कमळ हे श्रीविष्णू व लक्ष्मी या पालनकर्त्या देवतांचे प्रतिक आहे. श्रीमहाराज जगत्‌‍चालक व भक्तप्रतिपालक असल्याने श्रीलक्ष्मी-विष्णू या दैवतांच्या स्थिती आणि कार्याशी साधर्म्य दर्शवितात.

भस्माच्या आडव्या तीन रेषा अर्थात ‌‘त्रिपुंड‌’ हे श्रीशिवतत्त्वासह त्रिदेव-त्रिलोक-त्रिगुण तसेच इच्छा-ज्ञान-क्रिया आदी शक्तींचे प्रतिक मानले जाते. भूत-भविष्य-वर्तमान या तिन्ही स्थिती आणि आध्यात्मिक-आधिभौतिक-आधिदैविक या त्रिविध तापांपासून मुक्त करण्याचेही ते प्रतिक आहे. श्रीमहाराजांचे अनादी अनंत रुप दर्शविणारे तसेच त्यांच्यातील शिवतत्त्व प्रगट करण्याचे देखील हे प्रतिक आहे. या बोधचिन्हाच्या वर्तुळाकारातील पिवळसर रंग तेज, बल, प्रकाश आणि उर्जा यांचे रुप प्रकट करणारा असून दोन्ही बाजूने वरच्या दिशेला जाणाऱ्या किरणांचे प्रयोजन वृद्धी, समृद्धी तसेच उत्कर्ष दर्शविण्यासाठी आहे.

बोधचिन्ह