श्रीं’चा पुण्यतिथी उत्सव
भाद्रपद शुद्ध पंचमी, श्रीऋषिपंचमी (08 सप्टेंबर 1910) या दिवशी ‘श्रीं’नी संजीवन समाधी ग्रहण केली. हा दिवस ‘श्रीं’चा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो. या पुण्यतिथी उत्सव प्रसंगी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या कालावधीत श्री गणेशयाग आणि श्री वरुणयागाचे आयोजन करण्यात येते.
‘श्रीं’च्या अवतारकार्यातील अलौकिक लीलांचे स्मरण करीत भक्तजन ‘श्रीं’चा पुण्यतिथी उत्सव विलक्षण श्रद्धा आणि भक्तीभावनेतून साजरा करतात.
श्री संस्थेद्वारे या तिन्ही उत्सवांचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. प्रत्येक उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, विशेषत: ग्रामीण भागातून आलेल्या भजनी दड्यांचा सक्रिय सहभाग असतो. ‘श्रीं’चे समाधी मंदिर व परिसरात या निमित्ताने विद्युतदिपांची रोषणाई करण्यात येते. अश्व, रथ, दडी अशा वैभवांसह ‘श्रीं’ची पालखी परिक्रमेकरिता निघते. टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने अवघे वातावरण दुमदुमते. या निमित्ताने श्रीभक्तांमधील भक्तिभावाचा कल्लोळ अनुभवावयास मिळतो.
यात्रा उत्सवात सहभागी होणाऱ्या भजनी दडीस 10 टाळजोड, 01 मृदंग आणि 01 वीणा आदी भजनी साहित्य, नियमांची पूर्तता केल्यानंतर विनामूल्य वितरित करण्यात येते आणि श्रीज्ञानेश्वरी, श्रीतुकाराम महाराजांची अभंगगाथा तसेच श्रीएकनाथ्ाी भागवत हे वारकरी संप्रदायातील शाश्वत संतवाङ्मय देखील विनामूल्य वितरित केले जातेे.
