श्री क्षेत्र पंपासरोवर
सह्याद्री पर्वतरांगेतील अत्यंंत निर्जन अशा घनदाट वनराईत, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखेपासून सुमारे 40 कि.मी. दूर अंतरावर वसलेले, श्री क्षेत्र पंपासरोवर (कपीलधारा क्षेत्र परिसर) हे पवित्र स्थळ भक्तभाविकांना अपार शांतता व अलौकिक समाधान देणारे तसेच ‘श्रीं’च्या अस्तित्वाची दिव्य अनुभूतीही प्रदान करणारे स्थळ आहे. श्रींच्या अवतारकार्यातील हे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे कारण, याच पवित्र स्थळी श्री महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या केली होती. श्री कपिलमुनी, प्रभू श्रीरामचंद्र आणि श्री हनुमंत, श्री ज्ञानेश्वर माऊली आणि समर्थ श्रीरामदासस्वामी यांच्या सहवासाने पुनित झालेल्या आणि श्री महाराजांचे साक्षात वास्तव्य घडलेल्या या दिव्य अलौकिक परिसरात या शाखेची स्थापना करण्यात आली.
साडे नऊ एकर विस्तार असलेल्या या शाखा परिसरात संगमरवरी दगडी बांधणीचे ‘श्रीं’चे भव्य मंदिर साकारलेले आहे. गाभाऱ्यात ‘श्रीं’च्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. ‘श्रीं’च्या मंदिराचे प्रवेशद्वार अत्यंत आकर्षक अशा कलाकसुरीने युक्त आहे. नक्षीदार भव्य कलाकुसर केलेल्या कमानीयुक्त सभामंडपातील गाभाऱ्यात विराजमान ‘श्रीं’चे भक्तजनांना दर्शन घेता येते. येथेच ‘श्रीं’चा गादी व पलंग ठेवलेला असून त्यावर ‘श्रीं’ची प्रतिमा आणि पादुका विराजमान आहेत. मंदिर परिसरात, श्रीराम तसेच श्रीहनुमंताच्या मूर्ती पाहावयास मिळतात.
नित्यक्रम, उत्सव आणि भोजनप्रसाद
श्री मंदिरात, श्री महाराजांची तिन्ही वेळची आरती, पूजा तसेच अभिषेक पुजाऱ्यांकरवी केला जातो. दर्शनार्थी भाविकांना दररोज महाप्रसाद वितरित केला जातो.
आध्यात्मिक व सामाजिक सेवाकार्य
येथील शांत, निवांत परिसर दर्शनार्थींचे चित्त वेधून घेणारा आणि मनाचा ठाव घेणारा आहे. येेथे अत्यंत मधुर, शीतल व निर्मळ पाण्याने वाहणारा अक्षय्य झरा आहे. परिसरातील मूळ रहिवासी पूर्वी या झऱ्याचे पाणी वापरीत असत. श्री संस्थेने या झऱ्याचे पाणी योग्य रीतीने टाकीत साठवून, त्याचे शुध्दीकरण करून नळाद्वारे वनवासी बांधवांना उपलब्ध करून दिले आहे.
झऱ्याच्या उगमस्थानी गोमुख तयार करण्यात आले असून, या कुंडाची नित्य सेवा व स्वच्छता सेवाधारी अत्यंंत श्रद्धेने करीत असतात. भक्तजनांस शांतचित्ताने साध्ाना करता यावी याकरिता येथे साधना स्थळ, साधनाकुटी, ध्यानकेंद्र आणि साधक निवास उभारण्यात आले आहेत.
श्री क्षेत्र पंपासरोवर हे श्री क्षेत्र कावनाई नजिक वसलेले आहे. येथील रहिवाशांकरिता श्री संस्थेद्वारा आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
