श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
श्री संस्थेने, प्रभू श्री रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री तीर्थक्षेत्र नाशिक येथील तपोभूमीत, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शाखा सुरू केली.
‘श्रीं’चे मंदिर ः साडे पाच एकर विस्तार असलेल्या या शाखा परिसरात संगमरवरी दगडी बांधणीचे ‘श्रीं’चे भव्य मंदिर साकारलेले आहे. गाभाऱ्यात ‘श्रीं’च्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ‘श्रीं’च्या मंदिराचे प्रवेशद्वार अत्यंत कलाकसुरीने युक्त असे धोलपुरी दगडातून निर्मिलेले आहे. येथील शांत, निवांत परिसरात दाखल होताच भव्य प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश करताना पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर दिसणारे ‘श्रीं’चे तितकेच भव्य संगमरवरी मंदिर दर्शनार्थींच्या मनाचा ठाव घेते. नक्षीदार भव्य कलाकुसर केलेल्या कमानीयुक्त सभामंडपातील गाभाऱ्यात विराजमान ‘श्रीं’चे दर्शन भक्तजनांस घेता येते. येथेच ‘श्रीं’चा गादी व पलंग ठेवलेला असून त्यावर ‘श्रीं’ची प्रतिमा आणि पादुका विराजमान आहेत.
नित्यक्रम आणि उत्सव ः श्री मंदिरात, श्री महाराजांची तिन्ही वेळची आरती, पूजा तसेच अभिषेक पुजाऱ्यांकरवी केला जातो. चतुर्थी, एकादशी आणि गुरूवारी भजन करण्यात येते तसेच ‘श्रीं’च्या प्रगटदिनी पारायण, हरिपाठ, महाप्रसाद वितरण करण्यात येतो. पौष महिन्यातील श्रीनिवृत्तीनाथ महाराजांच्या वारी दरम्यान दशमी ते द्वादशी या कालावधीत उत्सव साजरा करण्यात येतो आणि उपस्थित भाविकांना मिष्टान्नासह महाप्रसाद वितरीत केला जातो.
भोजन प्रसाद
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखेमध्ये येणाऱ्या श्री भक्तांकरीता भोजन प्रसाद तसेच अल्पोपहाराची सेवार्थ सुविधा नित्य उपलब्ध आहे.
सेवार्थ भक्तनिवास
श्री भक्तांच्या निवास व्यवस्थेकरिता 04 भक्तनिवास उपलब्ध आहेत.
आध्यात्मिक आणि सामाजिक सेवाकार्य
पौष महिन्यात, श्रीनिवृत्तीनाथ महाराजांच्या वारीमध्ये सुमारे 75,000 वारकरी भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येतेे. श्री संस्थेद्वारे धर्मार्थ दवाखान्याची व्यवस्था कार्यरत असून रूग्णांना विनामूल्य औषधोपचार केले जातात. वारकऱ्यांना भजनी साहित्याचे वितरण केले जाते. आजपावेतो 2,339 गावांना भजनी साहित्य वितरीत करण्यात आले आहे.
वनवासी बांधव कल्याणकार्य हेतूने श्री संस्थेतर्फे आदिवासी बांधवांकरीता फिरते रूग्णालय सेवा दिली जात आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने कापडप्रसाद व मिष्टान्नासह महाप्रसादाचे वितरण केले जाते.
