श्री क्षेत्र आळंदी
श्री संस्थेने, श्री विठ्ठलभक्तांचे व भागवत संप्रदायाचे परम श्रद्धास्थान असलेल्या संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांचे संजीवन समाधी स्थान, श्री क्षेत्र देवाची आळंदी या तीर्थक्षेत्र भूमीची शाखारुपाने निवड केली आहे. भागवत धर्माचा प्रसार व्हावा, श्री माऊलींच्या दर्शनार्थ येणाऱ्या वारकऱ्यांकरिता सेवाकार्य घडावे हा श्री संस्थेचा मुख्य हेतू होता. यासाठी श्री संस्थेने, येथे सर्वप्रथम भक्तनिवास उभे करुन आळंदी शाखेद्वारे भविष्यात केल्या जाणाऱ्या सेवाकार्याचा पाया रचलेला आहे.
येथे संगमरवरी दगडी बांधणीतून ‘श्रीं’चे मंदिर साकारलेले आहे. गाभाऱ्यात ‘श्रीं’च्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. ‘श्रीं’च्या मंदिराचे प्रवेशद्वार अत्यंत कलाकसुरीने युक्त असे धोलपुरी दगडातून निर्मिलेले आहे. नक्षीदार भव्य कलाकुसर केलेल्या कमानीयुक्त सभामंडपातील गाभाऱ्यात विराजमान ‘श्रीं’चे भक्तजनांना दर्शन घेता येते. येथेच ‘श्रीं’चा गादी व पलंग ठेवलेला असून त्यावर ‘श्रीं’ची प्रतिमा आणि पादुका विराजमान आहेत.
अन्य शाखांचा विचार करता, श्री क्षेत्र आळंदी येथील ‘श्रीं’चे मंदिर जमिनीपासून उंच स्थानावर आहे. मात्र मंदिर प्रवेशाकरिता, पायऱ्यांची सुयोग्य रचना आणि ठराविक अंतरावर, आकर्षक रंगसंगतीच्या फुलांनी सुशोभित सुरेख घुमटाकार बांधणीतील सज्जे व कठडे यांमुळे श्री मंदिराचे वैभव अधिकच खुलून येते. ही ज्ञानियांच्या राजाची नगरी असल्यामुळे वारकरी संप्रदायाचे प्रतिबिंब ‘श्रीं’च्या या मंदिरातही जागोजागी पाहावयास मिळते. श्रीविठ्ठल-रखुमाई, संतश्री ज्ञानेश्वर माऊली, संतश्री नामदेव महाराज आणि संतश्री तुकाराम महाराज अशा देव-संतादी श्रेष्ठांच्या मूर्ती श्री मंदिरात भक्तदर्शनार्थ स्थापित आहेत.
नित्यक्रम आणि उत्सव
श्री मंदिरात, श्री महाराजांची तिन्ही वेळची आरती, पूजा तसेच अभिषेक पुजाऱ्यांकरवी केला जातो. आषाढी, कार्तिकी वारी दरम्यान येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ‘श्रीं’च्या प्रगटदिन उत्सवाच्या निमित्ताने भक्तांना महाप्रसाद दिला जातो. सकाळच्या आरतीनंतर सुरू होणारा महाप्रसाद सायंकाळच्या आरतीपर्यंत अखंड चालू राहतो. रात्री मंदिर बंद होईपर्यंत लाडू प्रसादाचे वितरण करण्यात येते.
सेवार्थ भक्तनिवास
श्री क्षेत्र आळंदी शाखेमध्ये श्री भक्तांच्या निवास व्यवस्थेकरिता 04 भक्तनिवास उपलब्ध असून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आध्यात्मिक व सामाजिक सेवाकार्य
कार्तिकी यात्रेदरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी सुमारे एक लाख भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले जाते. या कालावधीत श्री भक्तांच्या आरोग्यसेवेसाठी शाखेच्या दवाखान्यात चार दिवस विनामूल्य आरोग्य तपासणी व उपचारसेवा चालविण्यात येते.
येथे उत्सव काळात कीर्तन, प्रवचन, भजनादी आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होतात. तसेच वारकऱ्यांना भजनी साहित्याचे वितरण केले जाते. आजपावेतो 726 गावांना भजनी साहित्य वितरित करण्यात आले आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर पुढील अध्यापनासाठी येथे येतात. त्यांच्या निवासाची तसेच 500 विद्यार्थ्यांना माधुकरी वितरणाची सेवा येथे कार्यान्वित आहे. गुरूवारी तसेच रविवारी ‘श्रीं’च्या मंदिरासमोर सायंकाळी आरतीनंतर मंंदिर बंद होईपर्यंत शिराप्रसादाचे वितरण करण्यात येते.
