श्री क्षेत्र पंढरपूर
संतकवी श्रीदासगणू महाराजांनी ज्याचे वर्णन, ‘सर्व संतांचा कमलनाभ’ असे केलेले आहे त्या श्री क्षेत्र पंढरपूरनिवासी श्री पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये श्री संस्थेेची ही शाखा आहे. या शाखेचा विस्तार साडे आठ एकर परिसरात झालेला असून येथे अयोध्यापती प्रभू श्री रामचंद्रांचे (श्रीसीतामाई, श्री लक्ष्मण व श्री हनुमंत यांच्यासह) मंदिरही आहे.
येथे संगमरवरी दगडी बांधणीतून ‘श्रीं’चे भव्य मंदिर साकारलेले आहे. गाभाऱ्यात ‘श्रीं’च्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. ‘श्रीं’च्या मंदिराचे प्रवेशद्वार अत्यंत कलाकसुरीने युक्त असे धोलपुरी दगडातून निर्मिलेले आहे. नक्षीदार भव्य कलाकुसर केलेल्या कमानीयुक्त सभामंडपातील गाभाऱ्यात विराजमान ‘श्रीं’चे दर्शन भक्तजनांस घेता येते.
श्री मंदिरानजिक प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्री रामचंद्र, श्रीसीतामाई व श्री लक्ष्मण यांच्या अतिशय मोहक अशा शुभ्र रंगातील विलोभनीय मूर्ती विराजमान आहेत. गाभाऱ्यासमोर श्री हनुमंताची मूर्ती स्थापित आहेत. तळघरात श्री महाराजांची प्रतिमा व पादुका स्थापित असून समोरील सभामंडपात भक्तजन पारायण करण्यासाठी बसतात.
नित्यक्रम आणि उत्सव ः श्री मंदिरात, श्री महाराजांची तिन्ही वेळची आरती, पूजा तसेच अभिषेक पुजाऱ्यांकरवी केला जातो. चातुर्मास कालावधीत वारकरी परंपरेनुसार चार महिने प्रवचन, भजन, कीर्तन आदींचे आयोजन केले जाते, तसेच वारकरी शिक्षण घेणाऱ्या 500 विद्यार्थ्यांना दररोज माधुकरी दिली जाते. तसेच स्वा.सु.नि.स. जोग महाराज वारकरी संस्था, आळंदी (पंढरपूर शाखा) येथील 150 विद्यार्थ्यांना दैनंदिन दोन्ही वेळा भोजनप्रसाद आणि श्री कापडप्रसाद अव्याहत सुरु आहे. आषाढी-कार्तिक वारीच्या वेळेस आठ दिवस अंदाजे तीन ते चार लाख भक्तांना महाप्रसाद वितरित करण्यात येतो.
भोजन प्रसाद व सेवार्थ भक्तनिवास ः श्री क्षेत्र पंढरपूर शाखेमध्ये येणाऱ्या श्री भक्तांकरिता भोजन प्रसाद तसेच अल्पोपाहाराची सेवा नित्य उपलब्ध आहे. एकादशीस उपवासाचे पदार्थ वितरीत केले जातात.
श्री भक्तांच्या निवास व्यवस्थेकरिता 05 भक्तनिवास सेवार्थ उपलब्ध आहेत.
आध्यात्मिक आणि सामाजिक सेवाकार्य
आषाढी-कार्तिकी एकादशी वारीच्या पर्वावर विविध प्रांतातून येणाऱ्या ग्रामीण भजनी दड्यांना भजनी साहित्य वितरित करण्यात येते. आजपावेतो, श्री क्षेत्र पंढरपूर येथे 4175 गावांना भजनी साहित्य वितरित करण्यात आले आहे.
या भजनी दड्या महाराष्ट्रातील नागपूर, हगोली, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, छ.संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे, साातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सधुदुर्ग, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर येथून तसेच कर्नाटकातील निझामाबाद, बागलकोट, बेळगांव, विजापूर, गदग, कोप्पल, सुमोगा, दावणगिरी, हावेरी, धारवाड, चिकमंगरुळ, कारवार, बिल्लारी, तुमकर, ओव्हर, बिदर आणि मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर व आंध्रप्रदेशातील आदिलाबादहून आलेल्या आहेत.
वरील सर्व दड्यांना प्रत्येकी 10 टाळजोड, 01 विणा, 01 मृदंग, 01 हातोडी आदी भजनी साहित्य त्याचप्रमाणे 01 ज्ञानेश्वरी, 01 श्री तुकाराम गाथा आणि 01 श्री एकनाथी भागवत आदी संतवाङ्मय याप्रमाणे भजनी साहित्य वितरित करण्यात आले आहे. आषाढ शुद्ध दशमी अथवा कार्तिक शुद्ध दशमीला सदर दड्यांना नियमांची पूर्तता केल्यावर कागदपत्रांची संगणकीय तपासणी करून एकादशीला भजनी साहित्य वितरणाची वेळ दिली जाते आणि त्या वेळेनुसार भजनी साहित्याचे वितरण करण्यात येते.
श्री रामनवमी, श्री ऋषिपंचमी आणि ‘श्रीं’च्या प्रगटदिनास महाप्रसाद वितरित करण्यात येतो. या उत्सवांत 01 लाखाचे वर भाविक प्रसादाचा लाभ घेतात. आषाढी-कार्तिकी वारीला सुमारे 4 ते 5 लाख वारकरी भक्त मंदिरात दर्शन व अन्य कार्यक्रमांस उपस्थित राहतात शिवाय शेगांवहून येणाऱ्या वारीतील वारकऱ्यांची व्यवस्थादेखील येथेच केली जाते.
आषाढी-कार्तिकी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी श्री संस्थेचे फिरते रूग्णालय आठ दिवस येथे सेवार्थ कार्यरत असते. प्रतिवर्षी 20 ते 25 हजार वारकरी या सेवेचा लाभ घेतात. श्री संस्थेतर्फे अद्ययावत होमिओपॅथी औषधालय सुरू केले असून वारकरी शिक्षण संस्था, संगीत विद्यालय तसेच सार्वजनिक कार्याकरिता दोन सभागृहे बांधण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त, श्री संस्थेने पंढरपूर परिसरात घेतलेल्या 18 एकर जमिनीवर सेवकनिवास आणि विविध भांडारगृहे बांधलेली आहेत.
