सेवार्थ नि:शुल्क पार्किंग व्यवस्था आम्ही कोणतेही ऑनलाइन रूम बुकिंग स्वीकारत नाही श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे

श्री क्षेत्र ओंकारेश्वर

श्री क्षेत्र ओंकारेश्वर

श्री संस्थेने, पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मभूमीत, 12 ज्योतिर्लिंगापैकी एका भक्तप्रिय अशा श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे शाखा सुरू केली.

श्री ओंकारमांधाता आणि श्री ममलेश्वर यांच्या सान्निध्यात श्री संस्थेची ही महाराष्ट्र प्रांताच्या बाहेरील शाखा आहे. येथील परिसर चार एकरांमध्ये विस्तारलेला आहे.

अखंड जागृत अशा ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या परमपावन भूमीवर एका पुरातन डेरेदार वृक्षाच्या साक्षीने संगमरवरी दगडी बांधणीतून ‌‘श्रीं‌’चे भव्य मंदिर साकारलेले आहे. गाभाऱ्यात ‌‘श्रीं‌’च्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे.

‌‘श्रीं‌’च्या मंदिराचे प्रवेशद्वार कलाकसुरीने युक्त असे धोलपुरी दगडातून निर्मिलेले आहे. या शांत, निवांत परिसरात दोन्ही बाजूंनी वेढलेल्या आकर्षक आणि विस्तीर्ण भक्तनिवासाच्या पार्श्वभूमीवर ‌‘श्रीं‌’चे भव्य संगमरवरी मंदिर दर्शनार्थींचे मन मोहून घेते.

नक्षीदार भव्य कलाकुसर केलेल्या कमानीयुक्त सभामंडपातील गाभाऱ्यात विराजमान ‌‘श्रीं‌’चे भक्तजनांना दर्शन घेता येते. येथेच ‌‘श्रीं‌’चा गादी व पलंग ठेवलेला असून त्यावर ‌‘श्रीं‌’ची प्रतिमा आणि पादुका विराजमान आहेत.

नित्यक्रम आणि उत्सव

श्री मंदिरात, श्री महाराजांची तिन्ही वेळची आरती, पूजा तसेच अभिषेक पुजाऱ्यांकरवी केला जातो. श्री नर्मदा जयंती, श्री महाशिवरात्री व श्रींचे प्रगटदिनानिमित्त एक लाखांहून अधिक भक्तांना मिष्टान्नासह महाप्रसादाचे वितरण केले जाते तसेच श्रावणमासानिमित्त चहाचे विनामूल्य वितरण करण्यात येते.

भोजन प्रसाद आणि सेवार्थ भक्तनिवास

श्री क्षेत्र ओंकारेश्वर शाखेमध्ये येणाऱ्या श्री भक्तांकरीता भोजन प्रसाद तसेच अल्पोपहाराची सेवार्थ सुविधा नित्य उपलब्ध आहे. श्री भक्तांच्या निवास व्यवस्थेकरिता 04 भक्तनिवास उपलब्ध आहेत.

वर्षभरात 18,000 परिक्रमा वासियांची सेवार्थ व्यवस्था करण्यात येते.

श्री नर्मदा परिक्रमावासियांकरीता शाखेमध्ये विशेष व्यवस्था केलेली आहे. येथे तीन दिवसांपर्यंत भोजनप्रसाद व निवास तसेच औषधोपचार व्यवस्था सेवार्थ करण्यात येते. परिक्रमावासी प्रस्थान करतेवेळी त्यांना बेड आणि आवश्यक स्टेशनरीसह नोंदणीकृत पास दिले जातात.

आध्यात्मिक आणि सामाजिक सेवाकार्य

श्रीक्षेत्र ओंकारेश्वर परिसर नेहमीच शिवभक्त व श्री नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांच्या गर्दीने व्यापलेला असतो. श्री संस्थेद्वारे यात्रेकरुंच्या करीता गावांत सेवार्थ ॲलोपॅथी दवाखाना आणि प्याऊ (जलकूप) उभारलेले आहेत.

श्री नर्मदा परिक्रमा मार्गावर परिक्रमावासियांसाठी पिण्याचे पाणी (प्याऊ) तसेच नर्मदेच्या घाटावर महिलांकरीता कपडे बदलण्याकरीता कुटियांची उभारणी करण्यात आलेली आहे. उत्सवकाळात सेवार्थ रूग्णालयामार्फत रुग्णसेवा दिली जाते. बौद्धिकदृष्टया गतिमंंद विद्यालयाला अन्नदान स्वरूपात मदतकार्य करण्यात येते.

भक्तनिवास व्यवस्था