श्री समाधी ग्रहण स्थान

श्री समाधी ग्रहण स्थान

'श्रीं'चे समाधिग्रहण स्थान

पूर्वकाळी हे 'श्रीं'च्या नित्य वास्तव्याचे स्थान होते. भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषिपंचमी) शके १८३२, दि. ०८ सप्टेंबर १९१० रोजी 'श्रीं'नी अवतारकार्याची समाप्ती करतेवेळी या ठिकाणी आपला देह विसर्जित केला. या पावन भूमीचे माहात्म्य अधोरेखित करतांना श्री संस्थेने येथे 'श्रीं'चे पवित्र स्मृतीस्थान उभारले आहे. या संगमरवरी दगडी बांधणीच्या चौरस आकारातील पवित्र स्थानाच्या शिरोभागी गोमुख व चांदीच्या पादुका स्थापित आहेत.

या स्थानाच्या मागील बाजूस असलेली श्रीविठ्ठल-श्रीरखुमाई यांची काळ्या पाषाणातील सुरेखशी मूर्ती भक्तांच्या हृदयाचा ठाव घेते.

'श्रीं'चे विश्रांती स्थान

'श्रीं'चे समाधिग्रहण स्थानाशेजारी, मागील बाजूस 'श्रीं'चे विश्रांतीस्थान आहे. अवतारकार्यार्थ मानवदेह धारण केलेल्या श्रीमहाराजरूपी 'परमेश' तत्वाचे, 'सद्गुरु' रुपाचे हे लौकिक जगातील 'विश्रांती' स्थान होते. पूर्वी येथे असलेल्या पत्र्याच्या झोपडीत 'श्रीं'चा नित्य वावर तसेच वास्तव्य असे.

'श्रीं'चा नित्य सहवास लाभलेल्या या पवित्रस्थानाचे माहात्म्य जपण्याच्या हेतूने येथे श्री संस्थेने, 'श्रीं'चा नित्य बैठकीतील पलंग व गादी ठेवलेली असून त्यावर 'श्रीं'च्या प्रासादिक लाकडी पादुका ठेवलेल्या आहेत. मागील बाजूस 'श्रीं'ची आशीर्वचन मुद्रेतील भक्तांना अभय देणारी भव्य प्रतिमा आहे.

दर्शनार्थी भक्तांना 'श्री' पादुकांवर मस्तक टेकवून 'श्रीं'च्या दर्शनस्पर्शाचे समाधान प्राप्त होते. 'श्री' दर्शनासाठी केलेल्या प्रयासाचे सार्थकत्व लाभते.